Pages

Monday, June 11, 2012

जस्ट लाईक दॅट १

                                                                              *** 
               अमेरिकन एअरपोर्टवर उतरताना सगळं त्याच्या डोळ्यासमोर येत होतं. सर्वसाधारणपणे लोकांना युनिवर्सिटीला अप्लाय केल्यापासूनचे क्षण आठवतात पण त्याला सगळंच आठवत होतं. वडील सरकारी नोकरदार असल्यामुळे शाळा तीन वेळा बदलली गेली. एका शाळेत खेळाला प्राधान्य होतं, एका ठिकाणी शिक्षणबाह्य स्पर्धांना तर एका ठिकाणी अभ्यासाला. त्यामुळे विशेष अशी कुठल्या गोष्टीची आवड निर्माण होणं वगैरे निदान शालेय जीवनात झालंच नाही. मित्र, घरं, वातावरण सतत बदलत राहिलं! त्यात सुदैव की दुर्दैव ठाऊक नाही पण त्याची शाळा संपली आणि दोन वर्षात वडिलांनी नोकरीतून व्होलेंटरी रिटायरमेंट घेऊन पुण्यात जागा घेतली आणि लहानसं पुस्तकं विकायचं दुकान सुरु केलं. पुण्यात कॉलेज करायचं म्हणून त्याने ओघानेच आधी स.प. मध्ये बी.एस्सी आणि मग फर्ग्युसनमधून एम. एस्सी. केलं. सगळं विशेष काही न ठरवताच होत गेलं. आई-वडील पुण्यात रमले होते. नातेवाईक सुद्धा बरेच होते. त्यातल्याच कुणीतरी त्याला अमेरिकेला जायला प्रयत्न करायला सुचवलं. मार्क बरे होते म्हणून की डॉक्युमेंट्स बरोब्बर मिळाली म्हणून की निव्वळ वेळ जुळून आली म्हणून ते माहित नाही पण त्याला एका चांगल्या विद्यापीठाकडून प्रवेश मिळाला. पहिल्या वर्षाची फीसुद्धा स्कॉलरशिप म्हणून मिळणार होती! विसाचं काम विनसायास होऊन आदित्य परचुरे अमेरिकेला निघाला. त्याला जाणवलं की त्याच्या आयुष्यात घडलेली प्रत्येक गोष्ट अशीच न ठरवता, प्लान न बनता घडली होती. 'जस्ट लाईक दॅट!' त्यामुळे अमेरिकन ऑफिसरने त्याला जेव्हा विचारलं- 'व्होट इस द पर्पस ऑफ युअर व्हिसीट?' (तुमचा या देशात येण्याचा हेतू काय?) त्यावर त्याने नादानादात उत्तर दिलं- 'आय डोंट नो' (मला माहित नाही). अमेरिकन अधिकारी गोंधळला. त्याने भुवया उंचावत विचारलं- 'सॉरी?'..आदित्य भानावर आला आणि त्याने उत्तरं द्यायला सुरुवात केली. 
       साधारण चार ते पाच 'बूथ ' पलीकडे एका बूथमध्ये बसलेला एक जाडजूड गोरा अधिकारी त्याच्या हातात समोरच्या इंडियन मुलीने दिलेला पासपोर्ट चाळून पाहत होता. 'प्रीटी गर्ल '  तो मनात म्हणाला. त्यानेही तिला सेम प्रश्न विचारला-  'व्होट इस द पर्पस ऑफ युअर व्हिसीट?' (तुमचा या देशात येण्याचा हेतू काय?). रमा फडकेचं उत्तर तयार होतं. 'एजुकेशन'. तिचं कायम असंच असायचं. उत्तरं तिच्याकडे कायम तयार असायची. शाळेत वाद-विवाद आणि क्विझ जेव्हा जेव्हा व्हायच्या तेव्हा रमाचा पार्टनर कोण इतकंच काय ते ठरवलं जायचं. आठवीत असेपर्यंत मुलं-मुलींमध्ये स्पर्धा व्हायची त्या दुसऱ्या जागेसाठी. पण सगळं फुटेज रमालाच मिळतं हे हळूहळू सगळ्यांच्या लक्षात आलं आणि रमाला माणसं लांब करायला लागली. दहावीत बोर्डात येणं असो किंवा भरतनाट्यममध्ये बक्षिसं मिळवणं असो, गर्दीतून वेगळं उठुन दिसणं हे जणू काही तिच्या पाचवीला पूजलं होतं. लहान वयातच तिला याची कल्पना आली आणि मग सुरु झाला आजपर्यंत न संपलेला प्रवास: 'गर्दीतलीच एक  सर्वसामान्य मुलगी होऊन राहण्याचा'. घरून करिअर कशात करायचं याचं बंधन नव्हतं. रमाने मेडिकल  केलं नाही याचं दुःख फडकेंना असलं तरी त्यांनी तिला कायम हवं तसं वागू दिलं.मुळात हुशात असणं ही काही चुकीची गोष्ट नव्हती पण रमाने स्वतःच्या हुशारीचं दडपण घेऊन ठेवलं..'जस्ट लाईक दॅट!'. मुंबई युनिवर्सिटीमध्ये एम. एस्सिला नंबर आल्यावर एच.ओ.डी. नी मागे लागून तिच्याकडून अमेरिकन युनिवर्सिटीसना ऍपलीकेशनस करून घेतली. पुन्हा एकदा रमाचा गर्दीत 'फिट इन' होण्याचा चान्स गेला आणि तिला एका मोठ्या युनिवर्सिटीमध्ये सरळ पी. एच. डीला ऍड्मिशन मिळाली. भारतापासून अमेरिकेत येण्यापर्यंतच्या प्रवासात तिने विचार करून झाला होता की 'आता मी अमेरिकेत शिकणारे..इथे मुळातच गर्दी नाही, प्रत्येक माणूस स्वतःची ओळख जपूनच वावरतो. इथे आपण आपल्याला जे योग्य वाटेल तेच करायचं..नो मोर एफर्टस टू फिट इन"
   सगळे सोपस्कार आटपले तेव्हा आदित्यने नवीन वेळ सेट केलेल्या घड्याळात पाहिलं. त्याला घ्यायला येणारी मुलं येऊन १५-२० मिनिटं तरी झाली असणारेत. तो त्यांनी सांगितलेल्या गेट नंबर बद्दल  चौकशी करायला लागला. तिथल्या एका लेडी ऑफिसरने त्याला पुढे जात असलेल्या एका पाठमोऱ्या मुलीच्या मागे जायला सांगितलं. आदित्यने थोडं पुढे होत तिला हाक मारली.
"हाय..यु गोईन टू गेट १७?"
"येस"
"ओके..आय ऍम हेडिंग द सेम वे"
"ओके"
पुढे चालत जाताना आदित्य परचुरे आणि रमा फडकेची एकमेकांशी पहिल्यांदाच ओळख झाली. तेव्हा पुढे काय होणारे याची त्यांनाच कल्पना नव्हती. 
                                                                            

8 comments:

pratiksha said...

utsukta vadhliy....

pratiksha said...

utsukta vadhliy.........

Nilottama said...

pudhe kadhi lihinar ahes?

Chaitanya Joshi said...

@Pratiksha:
I hope pudhchya parts madhun utsuktela nyay milel...ashich bhet det raha!!

Chaitanya Joshi said...

@Nilottama:
Laukarch...hi goshta jashi lihun hot jaail tashi ithe taknyacha vichar aahe...

Panchtarankit said...

सुरवात मस्तच झाली आहे. कथेचा फ्लो असाच कायम राहू दे.

Panchtarankit said...

सुरवात मस्तच झाली आहे. कथेचा फ्लो असाच कायम राहू दे.

Chaitanya Joshi said...

धन्यवाद निनाद! माझा प्रयत्न उत्सुकता आणि फ्लो दोन्ही कायम राहील हाच असणारे. अशीच भेट देत रहा!