Pages

Sunday, July 1, 2012

जस्ट लाईक दॅट ४

आत्तापर्यंत :
भाग १, भाग २, भाग ३ 
                                                                                  ***
"आदित्य, तुझा निर्णय नक्की आहे??"
"अ..हो..आणि आता लीझ पण करून झालं.."
"लीझचं मरो..तू घरी बोललास का?"
"अ..खरंतर नाही..पण सांगेन त्यांना..मित्रांनो..तुम्ही मला काळजीपोटी सांगताय की अजून काय हेतूने विचारताय ते नाही माहित मला..मी निर्णय घेतला..विषय संपला..आणि आपण त्या केअर टेकरला बोललो आहोतच की मे बी ६ महिन्यात अजून एक अपार्टमेंट लागेल आणि तेव्हा नवीन लीझ करू"
"ओके..तू जर का तुझ्या डिसिजनवर ठाम आहेस तर प्रश्नच मिटला"
"मग आता माझ्या आय मीन आमच्या अपार्टमेंटवर जाऊया का? जेवण झालं असावं"
"आमचं अपार्टमेंट..संसार थाटल्याची सगळी लक्षणं आहेत..हा सामान आणून देतो..ती स्वैपाक करते..मला मेघा म्हणाली की तिने काही कुकिंगचे कोर्सेस पण केलेत.."
"हो काय रे?"
"मला नाही माहित..आम्ही एकत्र राहायचं ठरवलं तेव्हा बायो डेटा नव्ह्ता पाहिला मी तिचा..आणि माझ्यापेक्षा तिच्याबद्दल जास्त माहिती तुम्हाला दोघांनाच आहे की...मलाच सांगता का तिच्याबद्दल काहीतरी?"
"हा तर चिडला...आम्ही गम्मत करतोय रे..पण तू काहीही म्हण..तुम्ही हा निर्णय घेऊन एक नवीन ट्रेंड सुरु केलाय..या सगळ्या हैद्राबादी, तमिळीयन्सना इतक्या वर्षात जे जमलं नाही ते..आम्हाला तुझा अभिमान वाटतो" राज म्हणाला.
"त्याच काये ना आदित्य..आपण जेव्हा भारत सोडून लंडन, अमेरिका किंवा कुठेही परदेशात जातो तेव्हा आपल्या डोक्यात काही हेरोईक कल्पना असतात..राहत्या घरातल्या सोई-सुविधांपासून ते भेटणाऱ्या माणसांपर्यंत प्रत्येक आणि प्रत्येक गोष्टीबद्दल..ऑन मोस्ट ऑफ द पार्ट विशेष काही बदलत नाही..हे घरी जेवण करणं, स्वतःचे कपडे स्वतः धुणं, कुणी न उठवता उठणं हे सगळं सुखावह धक्क्यांपेक्षा दुःखद जास्त असतं मला विचारशील तर..बाकी राहायचं म्हणालास तर मी तिथेही होस्टेलला इतर मुलांबरोबर राहिलो, इथेही राहतो..अभ्यास तिथेही होता, इथेही आहे..पोरं-पोरी एकमेकांशी एकदम मोकळं वागत असतील अशी आपली अपेक्षा असते पण तसंही काही होत नाही. हळूहळू अमेरिकेत राहूनही माणूस अशाच वातावरणाला युस्ड टू होऊन जातो..मग तू आणि रमा येता..आम्ही जशी अमेरिकेची कल्पना केली होती तसं तुमच्याबाबतीत होताना आम्ही बघतो..मग याला असूया म्हण..हेवा म्हण..तुला आणि रमाला कदाचित विशेष काहीच वाटत नसणारे..कारण तुम्ही या वातावरणाला नवीन आहात..आणि कसं राहायचं, कुणाबरोबर राहायचं याचे कोणतेही पूर्वग्रह न ठेवता राज म्हणाला तसे नवीन पायंडे पाडताय..सो वि आर प्राउड ऑफ यु.."
"ह.भ.प. जीतबुवा ठाकूर महाराज यांचं प्रवचन संपलं..आता भक्तांनी कृपा-प्रसादासाठी परचुरे-फडके निवासाकडे प्रस्थान करावं" राज आदित्यकडे पाहत म्हणाला.
आदित्यला साधारण सहा-आठ महिन्यांपूर्वी कुणी सांगितलं असतं की तो अजून काही दिवसांनी अमेरिकेला जाणारे आणि एका सुंदर मुलीबरोबर एका घरात राहणारे तर त्याने सांगणाऱ्याला वेड्यात काढलं असतं. बट तसंच झालं होतं. त्याने आणि रमाने मिळून एक अपार्टमेंट पार्टनर्स म्हणून रेंट केलं होतं. 
'घरी सांगणं वगैरे ठीके एक वेळ पण अमुला काय सांगायचं?' तो मनात विचार करत होता.

"तुला दर्शुने सपोर्ट केला वगैरे ठीके रमा..पण आर यु शुअर?" मेघाने कोथिंबीर चिरत विचारलं.
"मी एकटीने सपोर्ट केला का?मनीषा पण तेच म्हणाली. तिने प्रियाला फुटवायचा पण प्रयत्न केला हिला घ्यायला"- दर्शु
"मनीषा कधी काळी स्वतः एका मुलाबरोबर राहिली होती मुंबईत असताना...त्यामुळे ती असं म्हणणारच" - मेघा
"अगं पण तुम्ही दोघी कशाला भांडताय?आता ऑलरेडी सगळ्या प्रोसिजर्स झाल्या आहेत..युटीलिटी, इंटरनेट पण करून झालं"
"रमा, हा काही मुद्दाच नाहीये..तुम्ही दोघे खर्च कमी व्हावा म्हणून एकत्र राहताय किंवा पहिल्या दोन-तीन भेटीत तुम्ही एकमेकांना इतकं ओळखायला लागलात की तुम्ही एकत्र राहायचं ठरवलंत हे पण मला मान्य आहे. माझं म्हणणं इतकंच आहे की मुलांचं वेगळं असतं..आपल्या मुलींचे प्रॉब्लेम्स वेगळे..कित्येक गोष्टींवर बंधनं येतात..मुलांना हा प्रश्न नसतो..त्यामुळे तुझी अडचण होऊ नये इतकंच..नाहीतर असं नको व्हायला की पैसे वाचवायला म्हणून एकत्र राहिलो आणि नंतर खर्च झाला असता तर परवडलं असतं असं म्हणायची पाळी आली.."
"मेघा..मी आले त्या दिवशी तूच म्हणाली होतीस आठवतंय..की काही वेळी आपण उगाच विचार करत बसतो..गोष्टी व्हायच्या तशाच होतात..'जस्ट लाईक दॅट'..सो आता मी आणि आदित्य एकत्र राहणार आहोत..त्याला त्याची स्वतंत्र बेडरूम आहे..कुकिंगच्या टर्नस आणि इतर कामांच्या टर्नस आम्ही तुमच्यासारख्या वाटून घेणारोत..सो.."
"हो..म्हणून आज हाउस वॉर्मिंगला त्याने तुला कामाला लावलं...मी तुला यात सपोर्ट नाही करू शकणार बरं का.." दर्शु फिल्टरमध्ये पाणी ओतत म्हणाली.
"अगं..त्याला काही नीट येत नाही..आणि हाउस वॉर्मिंग करायची कल्पना माझी..त्याने मला डेलीमधून सगळं सामान आणून दिलं..भले त्याला जीतच्या गाडीतून जाऊन यायचं होतं..तरी..आणि मग तो मदत करणार होताच..त्यात तुम्ही दोघी आलात..म्हणून मग तो जीतच्या घरी गेला"
"तू तो तुझा नवरा असल्यासारखी त्याची बाजू घेऊन भांडू नकोस..आणि दर्शु आपण आलो म्हणून तो गेला बरं का..पुढच्या वेळी या दोघांना काय घालायचा असेल तो गोंधळ घालू दे.." मेघा हसत म्हणाली. तिघी हसल्या.
"तसा ठीके गं तो..रमाला आवडला तर काही वाईट नाही..मलापण आवडला आहे.." दर्शु म्हणाली.
"लक्षात ठेवेन बरं का मी.." रमा हसत म्हणाली.
"अगं एक विचारायचंच राहिलं..तू तुझ्या घरी काही बोललीस का तुमच्या या अरेंजमेंटबद्दल..?"
"नाही अजून..सांगेन..बाबांना सांगेन..आईला सांगायचं की नाही ते बाबाच ठरवतील.."
'बाबा काही म्हणणार नाहीत याची खात्री आहे मला..आदित्यशी फोनवर बोलतील जनरल..आदित्यसुद्धा हो म्हणालाय त्यांच्याशी बोलायला..त्यांना फोनवरची २-३ मिनिटंपण पुरे झाली..हां..ते श्रीला सांगितलंस का म्हणून नक्की विचारतील..श्रीला काय सांगणारे मी?'  

क्रमशः

भाग ५ इथे वाचा

No comments: